अनधिकृत होर्डिंग्ज अंगावर पडल्याने दुचाकीस्वार जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुख्य चौक आणि पथदिव्यांच्या खांबांवर बेकायदेशीरपणे लटकवलेले अनधिकृत होर्डिंग्ज आता नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. मंगळवारी (दि. २७) सिडको उड्डाणपुलावरील पथदिव्यांवर लावलेला एक अनधिकृत फ्लेक्स सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थेट धावत्या दुचाकीवर कोसळला. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेनंतर निष्काळजी महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून, कारवाईसाठी मनपा कुणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात सुरू असलेल्या एका कार्यक्रमाचे होर्डिंग्ज शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. सिडको उड्डाणपुलावरील पथदिव्याच्या खांबालाही हे होर्डिंग्ज लावले आहेत. ते एका तारेच्या सहाय्याने खांबाला लटकविले आहेत. मंगळवारी दुपारी वारा सुटल्याने उड्डाणपुलावील एक होर्डिंग्ज दुचाकीसमोर पडले. अचानक अंगावर आलेल्या या होर्डिंग्जमुळे एक दुचाकीस्वार तोल जाऊन
रस्त्यावर पडला. नागरिकांनी धाव घेऊन त्यांना उचलले व होर्डिंग्ज बाजूला केले.
काही महिन्यांपूर्वीच एकाचा मृत्यू
महापालिकेलेन काही महिन्यांपूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनरविरोधात मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत अनधिकृत होर्डिंग काढताना वीजेचा शॉक लागून मुकुंदवाडी परिसरात एकाचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनी ही मोहिमही गुंडाळण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे म्हणाले की, अनधिकृत होर्डिंग्जवर नियमितपणे कारवाया करण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई होणे अपेक्षीत आहे. या कारवायांबाबत पुन्हा आढावा घेण्यात येऊन शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली जाईल.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions